पार्श्वभूमी
सन 2022 मध्ये भारतास स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. सदरचे औचित्य साधून देशातील प्रत्येकाला हक्काचे घर असावे या हेतूने मा.पंतप्रधान महोदयांनी “प्रधानमंत्री आवास योजना - सर्वांसाठी घरे” ही योजना राबविण्याची जून, 2015 मध्ये घोषणा केलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने 9 डिसेंबर, 2015 रोजी महाराष्ट्र राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र राज्याने सन 2022 पर्यंत 19.40 लक्ष घरकुलांच्या बांधणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि राज्यात योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची गती वाढवण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ मर्या.” (महाहौसिंग) ची स्थापना केली आहे.
महाहौसिंगची स्थापना
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ मर्यादित (महाहौसिंग), ही महाराष्ट्र शासन मालकीची संस्था, 28 जानेवारी 2019 रोजी भारतीय कंपनी कायदा 2013 अंतर्गत कंपनी नोंदणी क्रमांक U45500MH2019SGC320271 आणि शासन निर्णय क्र. महाहौसिंग/2017/प्र.क्र.161/गृनिधो-2 दिनांक 11/12/2018 अन्वये स्थापन झाली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ मर्यादित (महाहौसिंग) मध्ये खालील यंत्रणांच्या प्रत्येकी रु. 200.00 कोटी इतक्या निधीच्या समभाग गुंतवणुकीत केली आहे.
- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)
- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (झोपुप्रा)
- शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित (SPPL)
याशिवाय खुल्या बाजारातून भांडवल उभारण्याची तसेच बँका आणि अन्य वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याची महाहौसिंगला मुभा आहे.
संचालक मंडळाची रचना
अ.क्र. | मंडळातील सदस्य | पद |
---|---|---|
1 | मा. मुख्यमंत्री | अध्यक्ष |
2 | मा. मंत्री (गृहनिर्माण) | अतिरिक्त अध्यक्ष |
3 | अशासकीस सदस्य | सह अध्यक्ष |
4 | मा. अपर मुख्य सचिव, (गृहनिर्माण) | संचालक |
5 | मा. प्रधान सचिव (नगर विकास-2) | संचालक |
6 | मा. उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) | संचालक |
7 | मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (झोपुप्रा) | संचालक |
8 | मा. व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित (शिपूप्र) | संचालक |
9 | मा. सभापती, नागपूर सुधार प्रन्यास | संचालक |
10 | मा. महानगर आयुक्त, मुबंई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण | संचालक |
11 | मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, शहर औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) | संचालक |
12 | मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक | संचालक |
13 | अशासकीस सदस्य-1 | संचालक |
14 | अशासकीस सदस्य-2 | संचालक |
15 | उद्योग क्षेत्रातील तज्ञ (Domain Expert) | संचालक |
16 | उद्योग क्षेत्रातील तज्ञ (Domain Expert) | संचालक |
17 | मा. मुख्य कार्यकारी अधिकारी | Managing Director |
महाहौसिंगची कार्य व जबाबदाऱ्या
- महाराष्ट्र शासनाच्या दि. 11.09.2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार संयुक्त भागीदारी तत्वावर राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने परवडणाऱ्या घरांच्या गृहप्रकल्पांचे नियोजन, बांधकाम करुन गृहप्रकल्प राबविणे.
- AHP-JV किंवा AHP अंतर्गत आर्थिक दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) घटकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वतःच्या निधी / अनुदानातून परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प हाती घेणे.
- परवडणाऱ्या गृहप्रकल्पांच्या निर्मितीसाठी सरकारी अनुदान/ निधीतून आणि/खुल्या बाजारातून निधी उभारणे.
- विविध प्रशासकीय तथा तांत्रिक कारणास्तव रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणे.
- प्रचलित विकास योजनांनुसार इतर केंद्र आणि राज्य योजना / संस्था यांच्या सहकार्याने परवडणारी गृहप्रकल्पांची योजना राबविणे.
- महाहौसिंग मालकीच्या व महामंडळाशी संलग्न जमिनी, घरे आणि इमारतींचे संरक्षण व व्यवस्थापन करणे.
- घरकुलांचे वितरण / वाटप योग्य व परदर्शकपणे करणे.
- परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या निर्मितीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
- त्रिपक्षीय सल्लागांराच्या सहकार्याने / मदतीने परवडणाऱ्या घरांच्या गुणवत्तेची खातरजमा करणे.